सातारा – जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्ह्यातील आशा वर्कर्स संघटनेच्या सदस्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर जोरदार निदर्शने केली.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी अंशदायी पेन्शन योजनेला विरोध करून 2005 पूर्वीची पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करताना लाक्षणिक संप केला.
ग्रेड पे, रिक्त पदांची भरती व जुन्या पेन्शन योजनेच्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेतील वर्ग दोन व तीनच्या लिपिकांनी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी सकाळी निदर्शने केली.
आशा वर्कर्स युनियनच्यावतीने गटप्रवक्त्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. वेतन अनुदान वाढीसह इतर अठरा मागण्यांसाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक आशा वर्कर्स आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. या मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला. जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना निवेदन देण्यात आले. डीसीपीएस पेन्शन योजना लागू झालेल्या प्राथमिक शिक्षकांनीही आज लाक्षणिक संप केल्याने जिल्हा परिषदेच्या बहुतांश शाळांचे कामकाज कोलमडले.
लिपिकांच्या संपाने जिल्हा परिषदेचे कामकाजही ठप्प झाले होते. दरम्यान, शिरवळ, खंडाळा येथेही लिपिकांनी निदर्शने केली. शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती व जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्यावतीने
खंडाळा पंचायत समिती कार्यालयासमोर काम बंद आंदोलन करण्यात आले.
याबाबत गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले यांना निवेदन देण्यात आले. या मागण्यांसाठी शासकीय निमशासकीय शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समिती व जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी राज्य संघटनेच्या सूचनांनुसार दि. 5 ते 8 सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून काम केले होते.