एक चोरटा अटकेत, तिघे पसार; कराडच्या गजानन सोसायटी येथील घटना
कराड – येथील गजानन हौसिंग सोसायटीमधील बँक ऑफ इंडियाचे एटीएम जिलेटीनच्या कांड्या लावून उडवून देण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला.
जिलेटीन लावून एटीएम फोडणाऱ्या एका चोरट्यास कराडच्या दामिनी पथकाच्या पोलिसांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. यावेळी झालेल्या झटापटीत तीन चोरटे पसार झाले. दरम्यान, पोलिसांनी दुपारी जिलेटीन कांड्याचा स्फोट करुन त्या निकामी केल्या.
सचिन अशोकराव वाघमोडे (वय 38, रा. आदर्श नगर, काळेवाडी, पुणे) असे पोलिसांनी पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. याच ठिकाणी एक मोटरसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गजानन हौसिंग सोसायटीत काही लोक एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती वायरलेसद्वारे कराड पोलिसांना मिळाली. वायरेलस कक्षातील महिला पोलिसाने प्रसंगावधान राखत हा प्रकार पेट्रोलिंग करत असलेल्या दामिनी पथकासह बीट मार्शल पथकास कळवला. पोलीस हवालदार जयसिंग राजगे, पाटील, सूर्यवंशी, गृहरक्षक दलाचे निकम वेगाने गजानन हौसिंग सोसायटीत पोहचले. त्यांनी चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी पोलिसांशी झटापट सुरू केली. पोलिसांनी धाडसाने चौघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. यातील एका चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. त्यामुळे पोलीस जखमी झाले. तरीही पोलिसांनी चोरट्यांना पकडून ठेवले. मात्र, पोलिसांच्या जखमी होण्याचा फायदा घेत तीन चोरटे पसार झाले.