पिंपरी, (प्रतिनिधी) – रस्त्यावर पथारी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस निरीक्षकाला धमकी दिल्याचा प्रकार पिंपरीमधील कपडा मार्केट येथे घडला. शुक्रवारी (दि. ५) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास कारवाई करत असताना पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना पथारीवाल्यांनी धमकावले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अब्दुल रहिमान जहाउद्दीन इद्रेसी, अनुपमा सिंग उर्फ अमृतकौर गुलजारसिंग विरदी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांच्यासह मोंट व एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार हे वाहतूक विभागातील अंमलदारांसोबत पिंपरी कपडा मार्केट येथे कारवाई करीत होते.
सार्वजनिक रस्त्यावर पथारी लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पथारी चालकांवर कारवाई करत असताना आरोपींनी पोलीस निरीक्षक शहाजी पवार आणि त्यांच्या अंमलदारांना शिवीगाळ करत धमकी दिली. आरोपींनी मोठ-मोठ्याने आरडाओरडा करून दहशत निर्माण केली.
यामुळे आजूबाजूच्या दुकानदारांनी त्यांची दुकाने बंद केली. पोलीस निरीक्षक पवार यांच्या मदतीसाठी आलेल्या अंमलदारांना देखील आरोपींनी अरेरावी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.