सातारा – पुनवडी या क्षेत्रातील उभारलेले क्रशर सर्व कायदेशीर परवानगी घेऊनच सुरू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे या क्रशरसंदर्भात कोणीही चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करू नये, असा स्पष्ट इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजूभैय्या भोसले यांच्या समर्थकांनी दिला आहे.
पुनवडी येथील क्रशर संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून निर्देश मिळाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमातून प्रसिद्ध झाले आहे. त्यासंदर्भात या समर्थकांनी त्यांची बाजू मांडली आहे. “”पुनवडी येथील खाणपट्टयाची कलेक्टर लीज ऑर्डर आहे. याची वेळोवेळी रॉयल्टी भरली जाते. महसूल शासन दरबारी जमा होतो. या क्रशरची वीज बिले सुध्दा कधीही थकली नसून येथील जागा एनए आहे.
यापूर्वी सुद्धा सुधीर देसाई यांनी या खाणपट्टयासंदर्भात उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र, त्या दाव्याचा सुध्दा निकाल त्यांच्या विरोधात लागला आहे. क्रशरच्या सर्व परवानग्या या कायदेशीर आहेत.”
परळी क्षेत्रातील फार्म हाऊस सुद्धा रितसर परवानगी घेऊन बांधले आहे. रहिवास व वाणिज्य कारणास्तव तत्कालीन नगररचनाकारांची परवानगी आहे. या बांधकामास उरमोडी धरण प्रदूषण नियंत्रण महामंडळाची ना हरकत व परवानगी आहे. गट नं. 39 व 40 मध्ये साठ बाय साठ फूट शेतघर बांधकाम केले असून ते पूर्वपरवानगीने केले आहे.
या फार्म हाऊसची जागा वडिलार्जित आहे. त्याच्या रितसर नोंदी आहेत. आमचे नेते आणि आम्ही मूळ येथील भूमीपूत्र असून धरणग्रस्त आहोत. आम्ही कुठून बाहेरून आलेलो नाही. त्यामुळे फार्म हाऊस व क्रशरसंदर्भात कोणीही चुकीची वक्तव्ये करू नयेत, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व गोष्टी कायदेशीर असताना ते बेकायदेशीर असल्याचा गैरसमज निर्माण करू नये अन्यथा विरोधकांचा योग्य समाचार घेण्यास आम्ही समर्थ आहोत, असा इशारा राजूभैय्या भोसले समर्थकांनी दिला आहे.