सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंत्रणा सज्ज
ग्रामीण भागात उत्तम “कनेक्टिव्हिटी’ मिळणार
पुणे – नव्या शैक्षणिक वर्षाचे कामकाज ऑनलाइन सुरू करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने यंत्रणा विकसित केली आहे. कमी “कनेक्टिव्हिटी’ असलेल्या भागातही ही यंत्रणा वापरणे शक्य असून, यंत्रणेला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्यात आली आहे.
त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अद्ययावत यंत्रणेसह ऑनलाइन शिक्षण देणे सोपे होणार आहे. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी याची माहिती दिली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार उपस्थित होते. या यंत्रणेमुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.
10 कॉलेजमध्ये यंत्रणा यशस्वी
विद्यापीठाशी संलग्न दहा महाविद्यालयांमध्ये यंत्रणेची चाचणीही घेण्यात आली. त्यानंतर आता अन्य संलग्न महाविद्यालयांनाही ही यंत्रणा वापरता येणार असून, टप्प्याटप्प्याने सर्व महाविद्यालये या यंत्रणेचा वापर करू शकणार आहे.
कॉलेजवरही करडी नजर
पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये विद्यापीठाला महाविद्यालयातील शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांची उपस्थिती यावर लक्ष ठेवण्यास मर्यादा होत्या. मात्र, ही यंत्रणा वापरण्यास सुरुवात केल्यावर विद्यापीठाला महाविद्यालयांवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. किती महाविद्यालये यंत्रणा वापरत आहेत, किती विद्यार्थ्यांचा सहभाग, याची माहिती यंत्रणेद्वारे प्राप्त होणार आहे.
फक्त 3 महिन्यांत उभारणी
करोना संसर्गामुळे महाविद्यालये सुरू करण्यात मर्यादा आहे. मात्र, शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवण्यासाठी विद्यापीठाने तीन महिन्यांत संपूर्णपणे नवी यंत्रणा विकसित केली आहे.
प्रत्येक विद्याशाखेचे ई-साहित्य
प्रत्येक विद्याशाखेतील अभ्यासक्रमाचे ई-साहित्य तयार करण्यात येत आहे. दि. 5 ऑगस्टपासून टप्प्याटप्प्याने या यंत्रणेचा वापर करून अध्यापन सुरू केले जाणार आहे. विद्यापीठाने आतापर्यंत एक हजार तासांपेक्षा अधिक दृकश्राव्य ई-साहित्य उपलब्ध करून दिले आहे.
ऑनलाइन यंत्रणेची वैशिष्ट्ये
– यंत्रणेतील संवादात्मक पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना शंका विचारणे शक्य
– व्याख्यानांना ऍनिमेशन, ग्राफिक्सची जोड
– कोणतीच सुविधा, कनेक्टिव्हिटी नसलेल्या विद्यार्थ्यांना पेनड्राइव्हद्वारे ई-साहित्य पुरवणार
– क्लाउडवर आधारित यंत्रणेमुळे मोठ्या प्रमाणात वापर शक्य