अवघ्या एक हजार रुपये मानधनावर करताहेत काम
पिंपरी – “करोना’शी दोन हात करताना सर्वसामान्यांनी घरात बसून आणि काही योद्धांनी रुग्णालयात तर काही योद्धांनी रस्त्यावर उतरुन लढा देण्याची गरज असताना आशा सेविका देखील जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरल्या. अत्यंत धोकादायक परिस्थितीत बारा-बारा तास काम करणाऱ्या या आशा सेविकांना मात्र केवळ प्रतिमाह एक हजार रुपये मानधन देण्यात येते.
जुलै महिन्यात ते दोन हजार करण्याचे सांगण्यात आले, परंतु जुलै महिना संपत आला तरी मानधन वाढ करण्यात आली नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना आधार देत, त्यांना शासनाच्या तुटपुंज्या मानधनासह दरमहा पाच हजार रुपये मानधन व तीनशे रुपये भत्ता द्यावा, अशी मागणी शिवसेनेचे चिंचवड विधानसभा मतदार संघाचे संघटक संतोष सौंदणकर यांनी केली आहे.
सौंदणकर यांनी सांगितले की, आशा सेविकांना सध्या करोना संबंधित काम दिले आहे. या कामासह त्यांना लसीकरणाचे कामही करावे लागत आहे. हायरिस्क वातावरणात त्यांना काम करावे लागते. आशा सेविकांचा करोनाबाधित रुग्णांशी थेट संपर्क येतो. सकाळी नऊ वाजता कामावर रुजू झाल्यानंतर रात्री किती वाजता त्यांची सुटका होईल, हे निश्चित नाही. रात्री, साडेआठ, नऊ वाजता घरी गेल्यानंतर आशा सेविका आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाहीत. करोनामुळे शहरातील 64 आशा सेविकांच्या संसारावरच टांगती तलवार असल्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने त्यांना आधार देत, त्यांना विमा कवच व केंद्र व राज्य शासनाच्या तुटपुंज्या मानधनासह दरमहा पाच हजार रुपये मानधन व तीनशे रुपये भत्ता द्यावा. त्यामुळे या कोरोना परिस्थितीला तोंड देण्यासाठी त्यांना आधार व बळ मिळेल.
विम्याची मुदतही संपली
आशा सेविकांना परिचारिकांसोबत (एएनएम) प्रत्यक्ष फिल्डवर काम करावे लागते. कंत्राटी पध्दतीने घेतलेल्या “एएनएम’ला करोनाकाळात वाढीव वेतनासह प्रतिमहा सुमारे 22 हजार रुपये वेतन अदा केले जाते. मात्र, आशा सेविकांना त्यांनी केलेल्या कामाचा विचार करून मानधन दिले जाते. ही अत्यंत खेदाची बाब असून आशा सेविकांवर अन्याय केला जात आहे. करोनाकाळात त्यांना प्रतिमहा फक्त 1000 रुपये मानधन देण्याचा निर्णय घेतला गेला. जुलै 2020 मध्ये प्रतिमहा 2000 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन देण्यात आले. मात्र, जुलै महिना जवळपास संपत आलेला आहे. तरी, त्यांना कोणत्याही प्रकारची मानधनवाढ लागू झालेली नाही. करोना काळात म्हणजेच एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यात आशा सेविकांना 50 लाख रुपयांचा विमा लागू करण्यात आला.
आर्थिक अडचणीत आशा सेविकांचे कुटुंब
लॉकडाऊनच्या काळात अनेक आशा सेविकांच्या पतींच्या नोक-या गेल्या आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचा भार हा आशा सेविकांवर आलेला आहे. करोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांच्या कुटुंबावर सध्या आर्थिक अडचणी आहेत. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याची दुर्दैवी परिस्थिती सध्या आहे. ज्या महिला स्वतःचा जीव धोक्यात पिंपरी-चिंचवडकरांसाठी करोनाशी लढा देत आहेत, त्यांची कुटुंबे मात्र आर्थिक अडचणीत आहेत.
“एएनएम’प्रमाणे आशा सेविकांना 17 ते 18 हजार रुपये प्रतिमहा निश्चित वेतन मिळावे अन्यथा केंद्र व राज्य शासनाच्या तुटपुंज्या मानधनासह दरमहा पाच हजार रुपये मानधन व तीनशे रुपये भत्ता पालिकेकडून मिळावा. विमा मुदत संपली असल्याने चालू महिन्यात त्यांना हा विमा लागू नाही. फिल्डवर काम करताना त्यांचे बरेवाईट झाले तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार आहे का ? 50 लाखांचे विमा कवच जोपर्यंत पिंपरी-चिंचवड कोरोनामुक्त होत नाही, तोपर्यंत लागू करण्यात यावे.
– संतोष सौंदणकर, शिवसेना संघटक, चिंचवड विधानसभा,