मांडवगण फराटा (पुणे) – शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, असा सूर गेल्या 50 वर्षांत अनेकदा उमटला आहे. उत्पादन खर्च आणि बाजारभाव याचा ताळमेळ घालता घालता शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. अशीच एक घटना मांडवगण फराटा येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडली आहे. या शेतकऱ्यास मुंबई बाजारपेठेतून फ्लॉवरची पट्टी अवघे साडेनऊ रुपये आले आहे. त्यामुळे कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे.
किसन बाबुराव फराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून शेती करीत असून ते आपल्या शेतात दरवर्षी नवनवीन प्रयोग करतात. यावर्षी त्यांनी 2 एकर क्षेत्रात फ्लॉवरची लागवड केली होती. (दि.4) पहिल्यांदा त्यांनी आपल्या शेतातील फ्लॉवर पिकाची तोडणी केली. गुजरातमध्ये सुरतला पाठवला. यात त्यांना 8 रुपये बाजारभाव मिळाला. दोन वेळा फ्लॉवर सुरत येथे पाठवला. यात त्यांना 8 ते 9 रुपये दर मिळाला होता. पुन्हा (दि.11) एकाच दिवशी सुरत येथे 13 पिशव्या पाठवल्या होत्या. त्याला आठ रुपये दर मिळाला आहे. मुंबई येथे 17 पिशव्यांना साडेतीन रुपये दर मिळाला. यात त्यांना खर्च वजा जाता अवघे साडेनऊ रुपये त्यांच्या हाती आले आहेत.
शेती ही नेहमीच आतबट्ट्याची शेती ठरत असताना उत्पादक शेतकऱ्यानी हा प्रकार अनुभवला. त्याच्या हाती साडेनऊ रुपयांची पट्टी आली. यावर संबंधित शेतकऱ्याने साडेनऊ रुपयांचा धनादेश परत व्यापाऱ्याला देऊ केला आहे. त्यांची ही पट्टी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून नेटकऱ्याकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. शिरूर तालुक्यातील पूर्व भागात तरकारी उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत.
मिरची, भेंडी, वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी आदी पिके शेतकरी मोठ्या प्रमाणावर घेतात. ही तरकारी पिके पुणे, मुंबई, सुरत ,आदी ठिकाणी दररोज पाठवली जातात. किसन फराटे यांनी फ्लॉवरची लागवड केली. त्यांनी खते व औषधे देत पीक देखील जोमदार आले होते. तोडणीनंतर त्यांनी नवी मुंबई येथे फ्लॉवर विक्रीसाठी पाठवले होते. यावेळी सर्व खर्च वजा जाता हाती अवघ्या 9 रुपये 50 पैसे इतकी पट्टी लागल्याने फराटे यांची निराशा झाली आहे.
“फ्लॉवरला चांगला बाजारभाव मिळेल या आशेने मी लागवड केली होती. मात्र, ही आशा फोल ठरली आहे. उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. संपूर्ण पिकावर नांगर फिरवण्याची वेळ आता माझ्यावर आली आहे. संबंधित व्यापाऱ्याकडून फसवणूक होत आहे.शेतमालात जर फसवणूक होत राहिली, तर भविष्यात शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय उरणार नाही.”
– किसन फराटे, फ्लॉवर उत्पादक शेतकरी, मांडवगण फराटा.