दुबई – आयपीएल स्पर्धेला खास विंडो देण्याच्या आयसीसीच्या निर्णयाचा पाकिस्तान क्रिकेटला धक्का बसल्यामुळे आधीच संताप व्यक्त केलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाला पुन्हा एकदा आयसीसीने धक्का दिला आहे. 2023 ते 2027 या पाच वर्षांचा कार्यक्रम जाहीर केला असताना आयपीएलसाठी दिलेल्या विंडोदरम्यानच पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाणार असल्याने पाक मंडळाला चांगलाच फटका बसणार आहे. परदेशी खेळाडू पाक लीगपेक्षा आयपीएलला प्राधान्य देतील यामुळे सध्या पाक मंडळ थयथयाट करत आहे.
बीसीसीआयच्या आयपीएल लीगला आयसीसीने आपल्या पुढील पाच वर्षांच्या वेळापत्रकात प्रत्येक वर्षी अडीच महिन्यांची विंडो दिली आहे. ही विंडो 2023 पासून मिळणार असून 2025 साली पाकिस्तान सुपर लीग आणि आयपीएल या दोन्ही क्लॅश होणार आहेत. त्यामुळे याचा पाकिस्तानला मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.
पीएसएल मध्ये मिळणाऱ्या पैशांपेक्षा आयपीएलमध्ये मिळणारी रक्कम कित्येक पटीने जास्त असल्याने सहाजिकच परदेशी खेळाडू आयपीएलला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे. बीसीसीआयला आयसीसीने दरवर्षी मार्च ते जून अशी अडीच महिन्यांची विंडो दिली आहे.
पाक मंडळाचा संताप
पीसीबी पाकिस्तान सुपर लीग प्रत्येक वर्षी जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात आयोजित करते. मात्र, 2025 साली ही लीग पाकिस्तानला मार्च ते मे या दरम्यान घ्यावी लागणार आहे. कारण पाकिस्तानला फेब्रुवारी महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करायची आहे. त्यामुळे मार्च ते मे या दरम्यान पाकिस्तानच्या लीगचा शेवट आणि भारताच्या आयपीएल स्पर्धांचे सामने क्लॅश होण्याची शक्यता आहे. आता यावरून पुन्हा एकदा पाक मंडळाचा आयसीसी व बीसीसीआय विरोधात संताप व्यक्त होत आहे.