रोगांच्या प्रादुर्भावामुळे गहू, ज्वारी उत्पादन घटणार

दाणे भरण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकांच्या उत्पादनावर परिणाम
रांजणी  – आंबेगाव तालुक्‍यात गेल्या आठवड्याभरापासून सातत्याने वातावरणात बदल होत आहे. या बदलामुळे रब्बी हंगामातील हरभरा, ज्वारी, गहू या पिकांबरोबरच द्राक्षाच्या पिकांवरही रोगांचा चांगलाच प्रादुर्भाव झाला आहे. वातावरणातील हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनात घट येण्याची दाट चिन्हे आहेत.

तालुक्‍यात गेल्या काही दिवसापासून वातावरणातील सातत्याने बदल होत असून पाण्याची कमतरता आणि त्याचबरोबर रोगांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याचा विपरित परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर स्पष्टपणे जाणवत आहे. हरभरा आणि ज्वारीच्या पिकांवर रोगाचा चांगलाच प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. तालुक्‍यात रब्बी हंगामात गव्हाचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले गेले आहे. थंडीचे हवामान गहू पिकाला पोषक आहे. मात्र पहाटे सातत्याने धुके पडत असून आणि ढगाळ हवामानामुळे पिकांवर चांगलाच परिणाम जाणवतो. त्यामुळे गहू उत्पादनातही घट येते की काय असा प्रश्‍न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.

तालुक्‍यातील सातगावपठार भागात यंदाच्या रब्बी हंगामामध्ये ज्वारीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यात आले आहे. सातगाव पठार भागातील पेठ, कुरवंडी, कोल्हारवाडी, पारगाव, कारेगाव, थुगाव, भावडी आदी गावांमध्ये शेकडो एकर क्षेत्रात ज्वारीचे पिक घेण्यात आले आहे. सध्या ज्वारीच्या कणसात हवामानातील खराब वातावरणामुळे दाणे भरण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे यावर्षी ज्वारीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्‍यता शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.

2019 सालात तालुक्‍यात सातगाव पठारासह सर्वत्रच चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची उपलब्धता निर्माण झाल्याने मोठ्या प्रमाणात ज्वारी पिकाची पेरणी झाली. यंदाच्या हंगामात ज्वारीचे चांगले उत्पादन मिळणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्वारीची कणसे निसून त्यामध्ये दाणे भरण्याची प्रक्रिया सुरु होते. यंदा मात्र ज्वारीच्या निसवण्याचे प्रमाण चांगले असले तरी त्यामध्ये दाणे भरण्याचे प्रमाण अतिशय कमी आहे. आणि या प्रकाराने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसून येते.

ज्वारीचे दाणे भरण्यासाठी पोषक असलेले हवामान नसल्याने आणि वातावरणामध्ये सातत्याने थंडी, उकाडा, कधी धुके, कधी ऊन या स्वरुपाचे बदल सातत्याने होत आहेत. वातावरणातील या बदलाचा परिणाम ज्वारीमध्ये दाणे भरण्यामध्ये होत आहे. दरम्यान ज्वारीचे पीक यंदा चांगले असले तरी दरवर्षी ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणावर दाणे तयार होण्याची प्रक्रिया डिसेंबर व जानेवारी महिन्याच्या अखेरीस सुरु होत असते. परंतू यंदा ज्वारी पिकाची चांगली वाढ झाली असली तरी वातावरणातील सततच्या बदलामुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया खूपच कमी प्रमाणात आहे. त्यामुळे यंदा ज्वारीच्या उत्पादनात घट होवू शकते.
-दिलीप पवळे, शेतकरी.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.