कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील
मंचर – गौण खनिज उत्खननासंदर्भात नागरिकांना अनेक अडचणी येतात. महसूल विभागाकडून शेत जमिन तयार करणाऱ्या शेतकऱ्यांची अडवणूक केली जाते. हा प्रकार बरोबर नाही. गौण खनिज उत्खननासंदर्भातील कायदे, नियम नागरिकांना समजावेत. म्हणून महसूल विभागाने तालुक्यात शिबीर घ्यावे. परवाने देण्याची प्रक्रिया सोपी करावी, अशा सुचना कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिल्या.
घोडेगाव येथील तहसील कार्यालयात महसूल विभागाची आढावा बैठक कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र डूडी, तहसीलदार रमा जोशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, जिल्हा दुध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कैलास काळे, सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप आदी यावेळी उपस्थित होते.
तहसिलदार रमा जोशी यांनी महसूल विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. तालुकास्तरावर असलेल्या समन्वय समिती, संजय गांधी अशा विविध समित्यांचे कामकाज आमदारांना विचारुन व्हावे. विविध कमिट्यांवर लवकरच नवीन अशासकिय सदस्यांच्या नेमणुका केल्या जातील.तसेच हुतात्मा बाबु गेणु सागर (डिंभे धरण) प्रकल्प ग्रस्त, पुनर्वसीत गावठाणाचे प्रश्न व इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी प्रांताधिकारी जितेंद्र डुडी यांनी शिबिर घ्यावे.