नवी दिल्ली – मणिपूर प्रकरणी आक्रमक पवित्रा स्वीकारणारे विरोधी पक्षांचे नेते उद्या (बुधवार) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. त्या भेटीत राष्ट्रपतींना हस्तक्षेप करण्याचे साकडे घातले जाईल. तसेच, मणिपूरमधील भाजप सरकार बरखास्त करण्याची मागणीही त्यांच्यापुढे मांडली जाणार आहे.
मणिपूरमध्ये मे महिन्याच्या प्रारंभी हिंसाचार घडला. त्यानंतर हिंसक घटनांचे सत्र सुरू राहिल्याने त्या राज्यात अद्यापही तणावाची स्थिती आहे. त्या प्रकरणी संसदेत व्यापक चर्चा व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावे, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. मात्र, ती मान्य झाली नसल्याने विरोधकांनी आता राष्ट्रपतींना साकडे घालण्याचे ठरवले आहे.
इंडिया या विरोधकांच्या आघाडीचे सदस्य असणाऱ्या 21 खासदारांनी नुकताच मणिपूरचा दोन दिवसीय दौरा केला. ते खासदारही राष्ट्रपतींची भेट घेणाऱ्या विरोधकांच्या शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. मणिपूर मुद्द्यावरून होत असलेल्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज प्रभावित झाले आहे.