वॉशिंग्टन -अमेरिकेत करोनाने घेतलेल्या बळींचा आकडा 10 हजारांच्या पलिकडे गेला आहे. त्या देशातील करोनाबाधितांमध्ये भारतीय वंशाच्या अनेकांचा समावेश आहे. भारतीय वंशाच्या काहींचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहितीही पुढे आली आहे.
जगभरातील करोनाबाधितांची संख्या 14 लाखांजवळ जाऊन पोहचली आहे. बाधितांचा विचार करता अमेरिकेतील संख्या जगात सर्वांधिक आहे. त्या देशात 3 लाख 67 हजारहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. इटली आणि स्पेन पाठोपाठ 10 हजार मृतांचा टप्पा ओलांडणारा अमेरिका हा तिसरा देश ठरला आहे. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी या दोन प्रांतांमध्ये अमेरिकेतील एकूण बाधितांपैकी जवळपास निम्म्यांची नोंद झाली आहे. त्यामध्ये भारतीय अमेरिकींची संख्या लक्षणीय आहे. मात्र, त्याविषयीची नेमकी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी प्रांतांमध्ये करोनाने जवळपास 6 हजार जणांचा बळी घेतला आहे.
दरम्यान, जगभरातील 209 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. त्या विषाणूने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या 76 हजारांच्या जवळ जाऊन ठेपली आहे. इटलीत सर्वांधिक 16 हजारांहून अधिक रूग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल स्पेनमधील मृतांचा आकडा 14 हजारांजवळ पोहचला आहे. संपूर्ण जगालाच करोनाशी लढा द्यावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातूनही जगभरातील सुमारे 3 लाख रूग्ण करोनामुक्त झाल्याची बाब दिलासादायक ठरत आहे. करोना संकटामुळे जागतिक अर्थव्यवस्थेपुढेही मोठे आव्हान उभे राहिले आहे. करोनावर संपूर्ण मात केल्यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थित करण्याचे कार्य जगाला हाती घ्यावे लागणार आहे.