मेलबर्न – इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) होणे आवश्यक असल्याचे मत काही दिवसांपूर्वीच व्यक्त करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने आपल्या भूमिकेत बदल करत आयपीएलपेक्षा टी-20 विश्वकरंडक स्पर्धा जास्त महत्त्वाची असल्याचे सांगितले आहे.
करोनाच्या धोक्यामुळे 29 मार्चपासून सुरू होणारी आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलली गेली आहे. ही स्पर्धा विश्वकरंडक टी-20 स्पर्धेसाठी सरावाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे मत कमिन्सने व्यक्त केले होते. मात्र, ऑस्ट्रेलियात असलेल्या 6 महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे तसेच करोनाची स्थिती कायम असल्याने टी-20 विश्वकरंडक स्पर्धा देखील पुढे ढकलली जाणार असे संकेत मिळत आहेत.
मात्र, एकवेळ आयपीएल आणखी पुढे गेली तरी चालेल, पण विश्वकरंडक वेळापत्रकानुसारच झाला पाहिजे, असे मत कमिन्सने व्यक्त केले आहे. यंदाच्या मोसमासाठी झालेल्या आयपीएलच्या लिलावात पॅट कमिन्सला तब्बल 15.5 कोटी रुपयांची बोली लावत कोलकाता नाइट रायडर्स संघाने विकत घेतले होते.
2015 साली झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत आम्ही विजेतेपद मिळविले होते. त्यावेळी मला अंतिम लढतीत खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. यावेळी मात्र मी या स्पर्धेत सरस कामगिरी करण्यासाठी सज्ज झालो आहे, असेही कमिन्सने व्यक्त केले.