वाई – वाई पोलीस ठाण्यातील एकूण 16 कर्मचारी व नऊ नातेवाइकांना करोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कुटुंबीयांचे अहवाल अजून बाकी आहेत.
आरोग्य विभागाने बुधवारी (दि. 15) रात्री जाहीर केलेल्या अहवालांनंतर वाई तालुक्यात बाधितांची एकूण संख्या 216 झाली आहे. सध्या 100 रुग्णांवर उपचार सुरू असून 107 रुग्ण बरे झाले आहेत. नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे, वाई पोलीस ठाण्याचा कारभार पूर्ववत सुरू झाला असून नागरिकांनी आपल्या तक्रारी तेथे द्याव्यात, असे कळविण्यात आले आहे.
वाहतूक शाखेचा कर्मचारी चार दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याच्या संपर्कातील 17 जणांच्या स्रावांचे नुमने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सोमवार, मंगळवार व बुधवार, अशा सलग तीन दिवस आलेल्या अहवालांनुसार 16 पोलीस कर्मचारी व त्यांचे नऊ नातेवाइक बाधित झाले आहेत.
त्यात भर म्हणजे सोनगीरवाडीत बाधितांच्या संख्येत बुधवारी दोनने वाढ झाली आहे. यशवंतनगरात एक पुरुष, ब्राह्मणशाही, 50 वर्षांचा पुरुष, ओझर्डेजवळील धोम (पुनर्वसित) येथे 57 वर्षांचा पुरुष, पाचवड येथे 25 वर्षांची महिला व चार वर्षांच्या बालिकेलाही बाधा झाली आहे.
एकट्यावाई शहरात दोनच दिवसात तब्बल 84 रुग्ण सापडले असून सर्व बाधितांच्या संपर्कातील आणि खोकला, ताप असलेल्या शहरातील इतर नागरिकांच्या स्रावांचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीला पाठवले आहेत. बाधितांच्या संपर्कात आल्याने एवढ्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचाऱ्यांना संसर्ग झाला आहे.
दक्षता म्हणून ठाण्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्रावांचे नमुने घेतले आहेत. बधितांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयातील खाटा कमी पडण्याची शक्यता आहे. संभाव्य अडचणी लक्षात घेऊन प्रशासन येत्या काही दिवसांत अनेक लॉज, हॉटेल्स, मंगल कार्यालये ताब्यात घेणार आहे.