वडूज – वडूज शहरातील नागरिकांच्या घराचे घरपट्टी व पाणीपट्टी माफ करून शहरातील करोनाबाधित कुटुंबातील लोकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खटाव तालुका उपाध्यक्ष सुरज लोहार यांनी केली आहे. याबाबत त्यांनी आज वडूज नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात दिलेली अधिक माहिती अशी करोनाने अनेक कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक लोकांचे रोजगार गेल्याने सर्व व्यवसाय ठप्प असल्याने आर्थिक गणित कोलमडले आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे 2019- 20 मधील घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर नगरपंचायत प्रशासनाने माफ करावेत. शहरातील एका गरीब कुटुंबातील पाच लोकांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यापैकी एका ज्येष्ठ कर्त्या पुरुषाचे या आजाराने निधन
झाले.
त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट असून आपल्या कार्यलयामार्फत त्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी या निवेदनात केली आहे. यावेळी रोहित पवार, ऋषिकेश लोहार, विशाल गोडसे, अमन लोहार, सारंग गोडसे, मंगेश पवार आदींसह मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.