वाहनचोरांची शक्कल उघड, 12 मोटारी हस्तगत
पिंपरी – विमा कंपनीकडून अपघातग्रस्त व भंगारातील मोटार कवडीमोल भावात विकत घ्यायच्या, त्याच मॉडेलच्या मोटारी दुसऱ्या राज्यातून चोरून आणायच्या. चोरून आणलेल्या मोटारीला भंगारमधील मोटारीचा चेसी नंबर टाकून ती आरटीओ पासिंग करून विकून टाकायची, अशी शक्कल लढवून अनेक वाहने चोरुन नंतर विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. या आंतरराज्यीय टोळीच्या एका सदस्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 12 मोटार, 15 मोटारीचे इंजिन असा 2 कोटी 19 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
चनप्रीत हरविंदपाल सिंह (वय 43, रा. रावेत, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, भक्ती-शक्ती चौक ते मुकाई चौक या रोडवरील गॅरेजमध्ये मोठ्या प्रमाणात मोटरीचे इंजिन आणि सुटे पार्ट आहेत. तसेच गॅरेजच्या बाहेर दोन चोरीच्या मोटार असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील आणि पोलीस शिपाई सचिन मोरे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी गॅरेजचा मालक चनप्रीत याला ताब्यात घेतले. गॅरेज समोर पार्क केलेल्या मोटारीवर महाराष्ट्राचा पासिंग नंबर होता. तर इंजिन नंबर पंजाबमधील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी चनप्रीत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यास 13 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.
पोलीस तपासात आरोपीने सांगितले की विमा कंपनीकडून अपघातग्रस्त मोटार कागदपत्रांसह विकत घेत. या कारच्या मॉडेल आणि रंगाची मोटार इतर राज्यातून चोरून आणत. चोरून आणलेल्या गाड्यांवर अपघात झालेल्या खरेदी केलेल्या केलेल्या गाड्यांचे चेसिस नंबर लावून ते मोठ्या रकमेला विकत. या मोटारी 10 ते 18 लाख रुपयांपर्यंत विक्री करीत असत. आरोपीने विक्री केलेल्या 12 महागड्या मोटार पोलिसांनी जप्त केल्या. आरोपीचे कोंढव्यातही गॅरेज आहे. कोंढवा आणि रावेत येथील गॅरेजमधून इन्शुरन्स कंपनीकडून घेतलेल्या गाड्यांचे 13 आणि पंजाब, दिल्ली येथून चोरीला गेलेल्या गाड्यांचे दोन असे एकूण 15 इंजिन जप्त केले आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळूराम लांडगे, कर्मचारी रवींद्र राठोड, रवींद्र गावंडे, प्रमोद लांडे, बाळू कोकाटे, मनोजकुमार कमले, अमित गायकवाड, मारुती जायभाये, अंजनराव सोडगीर, महेंद्र तातळे, सचिन मोरे, सुनील चौधरी, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, विजय मोरे, गमेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.