नगर – एकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी बाप-लेकाला दोषी धरून प्रत्येकी पाच वर्षे सक्त मजुरी व प्रत्येकी 40 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
देवराम ऊर्फ गोट्या गंगाराम सातपुते, गंगाराम मानु सातपुते (रा. गुणोरे ता. पारनेर) अशी शिक्षा झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत.
आरोपी गंगाराम सातपुते याने महानगर बॅंकेतून घेतलेल्या कर्जास बाळासाहेब भाऊ बडे (रा. गुणोरे ता. पारनेर) जामीनदार आहेत. गंगाराम कर्ज भरत नाही म्हणून बॅंकेने बाळासाहेब यांना नोटीस पाठवून त्यांच्या जमिनीवर बोजा चढविला. कर्ज भरण्याचे सांगण्यासाठी बाळासाहेब यांचा मुलगा राहुल बडे आरोपीकडे गेला.
त्यावेळी राहुल यांना आरोपी गंगाराम व त्यांचा मुलगा देवराम ऊर्फ गोट्या याने शिवीगाळ करून हातोड्याने डोक्यात मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राहुल बडे यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात सातपुते बाप-लेकांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एस.आर.जांभळे, पोलीस उपनिरीक्षक विलास सोमवंशी यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.