नगर -जिल्ह्यात बुधवारी रात्री व आज सकाळी, या काळात नऊ करोनाबाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या आता 103 झाली आहे. दरम्यान परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी स्वतःला विलगीकरण करून घ्यावे, तसेच सार्वजनिक संपर्क टाळावा आणि ज्या ज्येष्ठ नागरिकांना मधुमेह व इतर आजार आहेत, त्यांनी सर्दी, खोकला किंवा इतर आजारांची लक्षणे आढळल्यास तत्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील करोना टेस्ट लॅब मध्ये 57 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासण्यात आले. त्यात या आठ व्यक्ती बाधित आढळून आल्या आहेत. यात घाटकोपर येथून टाकळीमियॉं राहुरी येथे आलेली 35 वर्षीय महिला भिवंडी येथून नगर शहरातील दातरंगे मळा येथे आलेला 60 वर्षीय व्यक्ती, ठाणे येथून पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडे येथे आलेला 46 वर्षीय व्यक्ती, नेवासा व श्रीगोंदा येथे प्रत्येकी एक घाटकोपर येथून अकोले येथील पिंपळगाव खांड येथे आलेल्या तीन व्यक्ती आणि राहता तालुक्यातील शिर्डी जवळील निमगाव येथील 55 वर्षीय महिला यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत दोन हजार 156 व्यक्तींच्या घशातील स्त्राव नमुने तपासले असून, त्यापैकी दोन हजार 11 निगेटिव्ह आले आहेत, तर 15 स्त्राव नमुन्यांचा निष्कर्ष काढता आला नाही. 11 व्यक्तींचे अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 33 जण उपचार घेत असून, तीन जण नाशिक येथे उपचार घेत आहेत, अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली.