पॅरिस -संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या करोना संकटाच्या काळात एक दिलासा देणारी बातमी आहे. करोनाबाधित पूर्ण बरे होण्याच्या जगभरातील संख्येने 25 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. बाधित बरे होण्याचे ते प्रमाण आशादायी आहे.
मागील वर्षीच्या अखेरीस चीनमध्ये सर्वप्रथम करोनाचा उद्रेक झाला. त्यानंतर त्या विषाणूने जगभरात हातपाय पसरले. जगातील 213 देश आणि प्रदेशांमध्ये करोनाचा फैलाव झाला आहे. सध्या जगभरात 58 लाखांहून अधिक बाधित आहेत. तर करोना संसर्गाने आतापर्यंत जगभरात 3 लाख 58 हजारांहून अधिक बाधितांचा बळी घेतला आहे. करोना संकटाचा सर्वांधिक फटका अमेरिकेला बसला आहे. त्या देशात 17 लाखांहून अधिक बाधित आहेत.
करोनाने आतापर्यंत अमेरिकेत 1 लाखहून अधिक बाधित दगावले आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून त्या देशातील बाधित संख्येची वाढ मंदावली आहे. त्याशिवाय, मृत्यूचे प्रमाणही घटले आहे. आशिया आणि युरोप खंडांमधील अनेक देशांनी करोना फैलाव आटोक्यात आणण्यात लक्षणीय यश मिळवल्याचे दिसून येत आहे. अशातच बाधित करोनामुक्त होण्याची जगभरातील आकडेवारी दिलासा देणारी ठरली आहे.