वॉशिंग्टन – अमेरिकेतील करोना बाधितांचा आकडा लक्षणीयरित्या वाढताना दिसत असून काल पुन्हा एका दिवसांत 20 हजारांपेक्षा अधिक लोकांना करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाल्याने तेथील एकूण करोना बाधितांचा आकडा 1 लाख 46 हजारांवर गेला आहे. तर मृतांची संख्या 2489 इतकी झाली आहे. करोना बाधितांच्या या विस्फोटामुळे अमेरिकन प्रशासनाची भंबेरी उडालेली दिसून येत आहे. एकूण 56 प्रांत आणि बेटांवर ही लागण झालेली दिसून आली आहे.
अर्थात सर्वाधिक रुग्ण न्यूयॉर्क परिसरात असून तेथील करोनाबाधितांचा आकडा 59 हजार 648 इतका आहे. त्या खालोखाल कॅलिफोर्निया प्रांताचा नंबर असून तेथील एकूण रुग्ण 13 हजार 386 इतके आहेत.
अमेरिकेत रूग्ण बरे होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे. एकूण करोना बाधितांच्या आकड्यापैकी काही जण बरे होऊन घरी सोडले गेले असले तरी अजून तेथे 1 लाख 35 हजार 684 लोकांवर उपचार सुरू आहेत. आपत्कालिन स्थितीत जादा संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था मोठ्या प्रमाणात केली गेली असून कोणत्याही संख्येने हे रुग्ण दाखल झाले तरी त्यांच्यावर तातडीने उपचार उपलब्ध व्हावेत यासाठीची पुरेपूर दक्षता तेथे घेतली जात आहे. पण हे करताना सर्वच प्रांतांच्या प्रशासनाची दमछाक होताना सध्या दिसत आहे.
दरम्यान युरोपातील करोनाची सर्वाधिक बाधा झालेल्या इटालितही करोना बाधितांचा आकडा एक लाखावर जाताना दिसत आहे. आज तेथील अधिकृत करोना बाधित रुग्ण 97 हजार 689 इतके असून मृतांची संख्या 10 हजार 779 इतकी आहे. स्पेन मधील आजची करोना बाधित रुग्णांची संख्या 80 हजार 110 इतकी झाली असून तेथील मृतांचा आकडा 6803 इतका झाला आहे.