नवी दिल्ली -कॉंग्रेसने बुधवारी रात्री १४ उमेदवारांची आठवी यादी जाहीर केली. त्यामुळे त्या पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरवलेल्या उमेदवारांची संख्या २०८ इतकी झाली. कॉंग्रेसच्या आठव्या यादीत उत्तरप्रदेश आणि तेलंगणातील प्रत्येकी ४, तसेच मध्यप्रदेश आणि झारखंडमधील प्रत्येकी ३ उमेदवारांचा समावेश आहे.
यावेळी कॉंग्रेस विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा प्रमुख घटक म्हणून निवडणुकीला सामोरा जात आहे. त्या पक्षाने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवार संख्येने २०० चा टप्पा ओलांडला आहे. मात्र, कॉंग्रेस नेमक्या किती जागा लढवणार ते स्पष्ट होऊ शकलेले नाही.
इंडियाच्या घटक पक्षांनी देशातील सर्व जागांसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतरच त्याबाबतचे नेमके चित्र समोर येण्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) नेतृत्व करणाऱ्या भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून कॉंग्रेसकडे पाहिले जात आहे.
मात्र, उमेदवार निवडीत भाजपने कॉंग्रेसला खूप मागे टाकले आहे. भाजपने आतापर्यंत ४०१ उमेदवार जाहीर केले आहेत. तोही पक्ष एकूण किती जागा लढवणार ते स्पष्ट झालेले नाही. देशात लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत.