वडापुरी -अवघ्या काही आठवड्यात येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रत्येक गट व गणात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. एकाच पक्षातून अनेकांनी तयारी सुरु केल्याने, सर्वच पक्षांची उमेदवारी देताना दमछाक होणार आहे.
गट, गण रचना अजूनही जाहीर होणे बाकी असतानाही पक्षातील कार्यकर्त्यांनी अंदाज बांधत केलेली गट व गण रचना डोळ्यासमोर ठेवून समर्थकांची कामे घेऊन नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. इंदापूर तालुक्यात पूर्वी 7 गट व पंचायत समितीचे 14 गण होते. आता नवीन रचनेत 2 गटांची वाढ झाली असून पंचायत समितीच्या 4 गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे नवीन अशा 6 समर्थक कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे.
इच्छुकांची मनधरणी करताना भाजप व राष्ट्रवादी च्या नेतृत्वासमोर पेच निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षासमोर इच्छुकांची समज काढणे मोठे आव्हान ठरणार आहे. विद्यमान पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांनी आपल्या गट व गणात येणारी पाच वर्ष डोळ्यासमोर ठेवून केलेली विकास कामे नवीन गट गण रचनेत वाया जाणार नाहीत ना? अशी शंका उपस्थित करीत आहेत.
नवे चेहरे संधी आजमावणार
आगामी काळात इंदापूर तालुक्यातील राजकारण ढवळून निघणार असून विद्यमान तरुण सदस्यांसह इतरही नवीन चेहरे निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत इंदापूर तालुक्यातून तरुणांची संख्या वाढणार असल्याचे दिसून येत आहे.