डेहराडून – भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचे चित्र असलेला मफलर परिधान करून मतदान केंद्रांना भेट दिल्याबद्दल उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप करण्यात आला आहे.
आम आदमी पार्टीचे उमेदवार एसएस कालेर यांनी धामी यांच्यावर हा आरोप केला आहे. सुमारे डझनभर वाहनांचा ताफा घेऊन एका मतदान केंद्रापासून दुसऱ्या मतदान केंद्रापर्यंत मिरवणूक काढून धामी यांनी प्रचार देखील केला असल्याचे या आरोपात म्हटले आहे.
कालेर हे खातिमा या मतदार संघामध्ये धामी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. भाजपने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटांमधून आदर्श आचार संहिता भाग झाल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. धामी यांच्याविरोधात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे आपण तक्रार करणार असल्याचेही त्यांनी म्हचले आहे.
रविवारी धामी यांनी मुदत उलटून गेल्यानंतरही प्रचार केला आणि मतदारांमध्ये पैशांचे वाटप केले याबद्दल कालेर यांनी यापूर्वीच निवडणूक निर्णय अदिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. धामी यांचे माध्यम सल्लागार विश्वास ढोबळ यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
धामी मुख्यमंत्री आहेत. ते जेथे जातात तेथे गर्दी जमा होते. त्यांनी प्रचार फेरी काढलेली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पैसे वाटप केले गेल्याच्या आरोपात आयोगाच्या पथकाला कोणतेही तथ्य आढळले नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.