पुढील युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रांनी लढू आणि जिंकू

लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली: लष्करात स्वदेशी तंत्राचा वापर अधिकाधिक करण्याची गरज लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की पुढील युद्ध आम्ही स्वदेशी बनावटीच्या यंत्रणेचा वापर करून लढू आणि ते जिंकून दाखवू. डीआरडीओ संचालकांच्या 41 व्या वार्षिक परिषदेत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.

ते म्हणाले की पुढील युद्धाची गरज ओळखून डीआरडीओच्या वैज्ञानिकांनी क्षेपणास्त्रे आणि अन्य शस्त्र प्रणाली तयार केली पाहिजे. या पुढील काळातील युद्धाचे तंत्र बदलेले असेल त्यावेळी आपल्याला सायबरस्पेस, अंतरीक्ष, लेझर, रोबोटिक्‍स, इलेक्‍ट्रॉनिक वॉरफेअर अशा नव्या तंत्र्याची गरज भासणार आहे. त्यावर आपण आत्तापासूनच विचार सुरू केला पाहिजे. तो जर आपण केला नाही तर आपल्याला नंतर खूप उशिर झालेला असेल.

डीआरडीओने गेल्या काही दशकांमध्ये अत्यंत वेगवान प्रगती केली आहे. त्यांच्या कामाचा लष्कराला अत्यंत चांगला उपयोग झाला असून यापुढील काळातही ही संस्था लष्करासाठी अत्यंत महत्वाचे योगदान देणारी संस्था म्हणून कार्यरत राहील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. आजही भारत विदेशातून शस्त्रे आणि दारूगोळा आणतो. स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनीही ही स्थिती असेल तर ती आपल्यासाठी फार अभिमानाची बाब नक्कीच नाही.

पण गेल्या काही दशकांपासून डीआरडीओने भारताला शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्रांच्या बाबतीत स्वयंपुर्ण करण्यात मोठेच योगदान दिलो आहे. त्यामुळे पुढील काळातील युद्ध आपण आपल्या देशात तयार झालेल्या शस्त्रास्त्रांच्या आधारे करू आणि ते जिंकून दाखवू असे ते म्हणाले. ही परिषद दोन दिवस चालणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.