क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावर सलिल अंकोला, संदीप पाटील, अजय जडेजा यांनी सिनेमांमध्ये काम केले होते. आता इरफान पठाण आणि हरभजन सिंग हे देखील सिनेमांमध्ये काम करण्यास सिद्ध झाले आहेत.
हे दोघेही तमिळ सिनेमांमधून अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहेत. एका सिनेमात इरफान पठाण खलनायकाच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्याच्या वाट्याला ऍक्शन सीनही खूप आलेले आहेत, असे समजते आहे.
चियान विक्रम हा या सिनेमाचा नायक आहे आणि त्याच्या सिनेमाचे शिर्षक अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र इरफानच्या वाट्याचे शुटिंग लवकरच सुरू होणार आहे. मुख्य म्हणजे या सिनेमात विक्रम 25 वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड असणार आहे.
तर दुसरीकडे हरभजन सिंगदेखील “डिक्कीलोना’ या तामिळ कॉमेडी सिनेमात काम करणार आहे. त्याचा रोल अगदी सरप्राईज असणार आहे. हरभजनने यापूर्वी “मुझसे शादी करोगी’ आणि पंजाबी फिल्म “भाजी इन प्रोब्लेम’ आणि “सेकंड हसबंड’मध्येही काम केले आहे. त्यामुळे त्याला या क्षेत्राचा बऱ्यापैकी अनुभव आहे. आता दोन्ही माजी क्रिकेटपटूंच्या या सिनेमाच्या कारकिर्दीतला पहिला बॉल कोण टाकतो आणि कोण जिंकतो, ते बघूया.