कराड – राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि महाराष्ट्राचं आगामी मुख्यमंत्रिपद काही दिवसांपासून जरा जास्तच चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आगामी मुख्यमंत्रिपदावरुन भाष्य केलं आहे.
राष्ट्रवादीच्या काही नेत्यांची तर भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टबाजी देखील करण्यात आली आहे. त्यात अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्या नावाने ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
हे सर्व सुरु असतानाच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कराड येथे माध्यमांशी बोलत असताना आगामी मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान केलं आहे.
त्यांनी म्हटलंय की, “महाराष्ट्राचा आगामी मुख्यमंत्री हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचाच होणार आणि आता हे सर्वांनी मान्य केलं आहे. दरम्यान, त्यांच्या या विधानानंतर राज्यात राजकीय चर्चांना उधाण आलं असून, इतर पक्षातील नेते यावर आता काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.