कोलार – कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोलार येथील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस अध्यक्ष खर्गे यांच्या विधानावर पलटवार केला. मोदी हे विषारी साप असल्याची टीका खर्गे यांनी केली होती. त्यावर बोलताना मोदी यांनी म्हटले आहे की साप हा भगवान शंकर यांच्या गळ्याची शोभा आहे. आणि माझ्यासाठी जनताच भगवान शंकर आहे असे त्यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेसचे इंजिन जुने झाले आहे. देशाच्या विकासात कॉंग्रेस आणि जेडीएस मोठा अडथळा आहेत असा आरोपही त्यांनी केला. तसेच माझी तुलना सापासोबत करून हे लोकांकडे मते मागत मागत असल्याचेही मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले की ही निवडणूक कोणताही आमदार किंवा खासदार निवडून देण्यासाठीची निवडणूक नाही तर देशाला पुढील 25 वर्षात पुर्ण विकसीत करण्याच्या रोड मॅपवर शिक्कामोर्तब करण्यासाठी ही निवडणूक असून कर्नाटकातील लोक भाजपच्याच पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसवर टीका करताना मोदी म्हटले की सन 2014 पुर्वी संपुर्ण जगाने भारता विषयीच्या सर्व आशा सोडून दिल्या होत्या. परंतु त्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने देशाची आर्थिक घडी वेगाने विकसित केली. त्यामुळेच भारत आज अर्थव्यवस्थेसाठी जगातील एक ब्राईट स्पॉट ठरला आहे. यावेळी मोदींनी कर्नाटकातील भाजप सरकारने केलेल्या कामांची उजळणी केली आणि मतदारांना भाजपच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.