पुणे – शहरातील नागरिकांना गतिमान सुविधा देण्यासाठी महापालिकेकडून नागरिकांशी संबंधित वेगवेगळ्या 152 सुविधा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालिकेकडून देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये मिळकतकर, पाणीपुरवठा, ड्रेनेज, जन्म-मृत्यू दाखला, बांधकामाशी संबंधित सेवा, घनकचरा यासह कल्याणकारी सेवांचाही समावेश आहे. तसेच या सेवांचे काम पुढील 6 महिन्यांत पूर्ण होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
राज्य शासनाकडून ई-गव्हर्नन्स अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक दैनंदिन सुविधा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने सेवा हमी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अंतर्गत महापालिकेने आतापर्यंत सुमारे 35 सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यात आणखी सेवांची भर पडणार असून सुमारे 152 सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून त्यासाठीची यंत्रणा उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षेखाली समिती नेमली असून या समितीतही याबाबत नुकतीच चर्चा झाली आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार, महापालिकेकडून ई-गव्हर्नन्स अंतर्गत नागरिकांना सध्या 35 सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सेवा वाढविण्यात येऊन पुढील 6 महिन्यांत पुणेकरांना 152 सेवांचा घरबसल्या लाभ घेता येणार आहे.
– राहूल जगताप, विभाग प्रमुख, माहिती आणि तंत्रज्ञान