खंडाळा तालुक्‍यातील तुळशीवृंदावन तलावात पाणी येणार

मदन भोसले यांच्या प्रयत्नांना यश : जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

खंडाळा – खेड, ता. खंडाळा परिसरातील गावांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी किसनवीर सातारा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व माजी आमदार मदन भोसले यांनी केलेल्या मागणीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी कागदी घोडे बाजूला सारून धोम-बलकवडीच्या कालव्यातून खेडच्या तुळशीवृंदावन तलावात पाणी सोडण्याचे आदेश दिले. पाण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून लढा देणाऱ्या खेड परिसरातील जनतेचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याने समाधान व्यक्‍त होत आहे.

यंदाच्या पावसाळ्यात खेड येथील तुळशीवृंदावन तलावात अद्यापही पुरेसा पाणीसाठा झालेला नाही. या तलावातील पाण्यावर खेड परिसरातील अनेक गावे अवलंबून आहेत. या तलावाच्या वरच्या बाजूने धोम-बलकवडी धरणाचा कालवा गेला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरलेल्याने या कालव्यातील पाणी तुळशीवृंदावन तलावात सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी मदन भोसले यांच्याकडे केली होती.

मदन भोसले यांनी शिष्टमंडळासह मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन तुळशीवृंदावन तलावात पाणी सोडण्याची मागणी निवेदनद्वारे केली होती. त्यावर ना. महाजन यांनी याबाबत आदेश दिला. यावेळी आनंदराव शेळके-पाटील, लोणंदचे नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, किसन वीर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे, खंडाळा कारखान्याचे संचालक बापूराव धायगुडे, भाजप जिल्हा सरचिटणीस अनुप सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष राहुल हाडके, लोणंद बाजार समितीचे संचालक राहुल नागर, खेडचे सरपंच सचिन धायगुडे, बबनराव शेळके, अशोकराव धायगुडे, तेजस क्षीरसागर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.