पिंपरी -राज्य सरकारने नोकर भरतीवरील निर्बंध उठविल्यानंतर महापालिकेच्या विविध विभागांतील ब आणि क गटातील 15 पदांच्या 388 जागांसाठी दि. 26, 27 व 28 मे ला परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील 26 शहरातील 98 केंद्रांवर होणार असून 98 निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली.
पालिकेने अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्रिशमन अधिकारी, विभागीय अग्रिशमन अधिकारी, उद्यान अधिक्षक (वृक्ष), उद्यान निरिक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ऍनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरिक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत) संवर्गासाठी रिक्त असलेल्या 388 पदांसाठी अर्ज मागविले होते. राज्यभरातून 85 हजार 771 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
दि. 26 मे रोजी एका सत्रामध्ये, दि. 27 मे रोजी तीन सत्रामध्ये तर दि.28 रोजी तीन सत्रामध्ये परीक्षा होणार आहे. महापालिकेने सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, सह शहर अभियंता यांच्यासह तब्बल 98 वरिष्ठ अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रावर निरीक्षकांच्या नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक परिक्षा केंद्रावर मोबाइल जॅमर लावण्यात आले आहे. तसेच केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही, स्कॅनची व्यवस्था करण्यात आली आहे.. शासन निर्णयानुसार दिव्यांगाकरीता आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.
सरळसेवा भरती परीक्षा पारदर्शक पध्दतीने आयोजित केली जाणार असल्याने कुठल्याही आमिषाला, गैरप्रकाराला बळी पडू नये. प्रवेशपत्र आणि परीक्षेच्या अनुषंगाने पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवळी जाहीर निवेदन, सुचना प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच परीक्षा कालावधीत तीनही दिवस पालिकेतील सामान्य प्रशासन विभाग मध्यवर्ती कक्ष म्हणून कार्यरत राहणार आहे. या कक्षाचा फोन क्रमांक पालिकेच्या संकेतस्थळावर देण्यात आला आहे.
– विठ्ठल जोशी,उपायुक्त, सामान्य प्रशासन