नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीतील शहादरा येथील विवेक विहार परिसरात शनिवारी (25 मे) मध्यरात्री एका बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग लागली. या आगीत 7 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा 12 बालकांना आगीतून बाहेर काढण्यात आले.
यापैकी एका बालकाचा आधीच मृत्यू झाला होता, तर त्यानंतर सहा बालकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या पाच बालकांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर एका मुलाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री 11.32 च्या सुमारास दिल्लीतील शाहदरा भागातील विवेक विहारच्या आयआयटी ब्लॉक बी येथे असलेल्या बेबी केअर सेंटरमध्ये आग लागली. या आगीची ती मिळताच अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीत अडकलेल्या कर्मचाऱ्यांना आणि नवजात बालकांना वाचवण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत सर्वांची सुटका करण्यात आली. एक नवजात मृतावस्थेत आढळून आले.
तर वाचवण्यात आलेल्या 12 नवजात बालकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सहा नवजात बालकांचा मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करत केअर सेंटरचे मालक डॉ. नवीन किची यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, बेबी केअर सेंटर 120 यार्डच्या इमारतीमध्ये बांधण्यात आले होते. तळमजल्यासह तीन मजली इमारत आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
इमारतीबाहेर उभी असलेली एक व्हॅनही पूर्णपणे जळून खाक झाली. घटनास्थळी गोंधळ सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली.
यावेळी पोलीस आणि अग्निशमन विभागासह आजूबाजूच्या लोकांनी इमारतीच्या मागील बाजूच्या खिडक्या तोडून नवजात बालकांना एक एक करून बाहेर काढले.
सातही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी जीटीबी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. रुग्णालयाचे मालक नवीन कीची यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.