पणजी – दक्षिण गोवा जिल्ह्यातील एका औद्योगिक वसाहतीत खासगी बसने रस्त्याकडेला उभारण्यात आलेल्या झोपड्यांना धडक दिली असून या अपघातात चार जणांचा बळी गेला आहे.
तसेच पाच जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. हे सर्व मजूर मूळचे बिहारचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
वेर्ना परिसरात रस्ते बांधणीचे काम करणारे मजूर त्याच रस्त्याच्या कडेला झोपडी बांधून राहत होते. मात्र शनिवारी रात्री एका खासगी बसने त्यांच्या झोपड्यांना धडक दिली. बस या झोपड्यांना भुईसपाट करून पुढे गेली.
पोलीस उपअधीक्षक संतोष देसाई म्हणाले, या बसचा चालक जवळच्याच कार्टोलिम गावचा रहिवासी आहे. भरत गोवेकर असे त्याचे नाव असून आम्ही त्याला ताब्यात घेतले आहे.
सध्या त्याची चौकशी चालू आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तो रात्री मद्यधुंद अवस्थेत बस चालवत होता हे उघड झाले आहे.