Ostrava Golden Spike 2024 & Neeraj Chopra : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा 28 मे रोजी ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक 2024 स्पर्धेमध्ये सहभागी होणार नाही. याला दुजोरा देत आयोजकांनी सांगितले की, दुखापतीमुळे तो या स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. मात्र, तो या कार्यक्रमाला अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे. अलीकडेच चोप्राने दोहा डायमंड लीग आणि फेडरेशन कपमध्ये भाग घेतला होता.
काही आठवड्यांपूर्वी ऑलिम्पिक आणि विश्वविजेता नीरज चोप्राला प्रशिक्षणादरम्यान स्नायूंना दुखापत झाली होती, त्यामुळे त्याला सरावातून बाहेर पडावे लागले होते. तथापि, 26 वर्षीय खेळाडू वार्षिक ऍथलेटिक्स स्पर्धेच्या 63 व्या आवृत्तीत अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे.
नीरज ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइकमधून बाहेर पडण्याचे हे सलग दुसरे वर्ष आहे. गतवर्षी स्पर्धेसाठी त्याचाही या यादीत समावेश करण्यात आला होता, परंतु स्नायूंच्या दुखापतीमुळे तो भाग घेऊ शकला नव्हता. आयोजकांनी नीरज चोप्राच्या जागी जर्मनीच्या ज्युलियन वेबरचा समावेश केला आहे. ओस्ट्रावामध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये टोकियो 2020 चा रौप्यपदक विजेता आणि डायमंड लीग आणि गोल्डन स्पाइक चॅम्पियन खेळाडू जैकब वाडलेज्च देखील सहभागी होणार आहे. ग्रेनेडाचा माजी विश्वविजेता अँडरसन पीटर्सही यात सहभागी होत आहे.
भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला ऑलिम्पिकच्या दोन महिने आधी स्नायूंचा त्रास झाला आहे. नीरज चोप्राने इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली आहे. त्याने लिहिले आहे की- “भालाफेकच्या सराव सत्रात भाग घेतल्यानंतर, मी ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत भाग न घेण्याचा निर्णय घेतला आहे. मला याआधी ही समस्या आली आहे. जर मी अशा परिस्थितीत या टप्प्यावर स्पर्धेत भाग घेतला तर त्याचे रुपांतर दुखापतीत होऊ शकते.
पुढे त्याने लिहिले आहे की,” मी हे स्पष्ट करत आहे की, मला दुखापत झालेली नाही, पण ऑलिम्पिकपूर्वी मला कोणतीही जोखीम पत्करायची नाही. पूर्णपणे फिट होताच मी चॅम्पियनशिपमध्ये परतेन. आपल्या सहकार्याबद्दल आपले आभार.”
दरम्यान, पॅरिसमध्ये 2 महिन्यांनंतर ऑलिम्पिक खेळ सुरू होणार असताना नीरजला दुखापत झाली आहे. दुखापत गंभीर झाल्यास भारताच्या सुवर्णपदकाच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. याआधी नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.