बुलढाणा – मुंबई – संभाजीनगर- नागपूर महामार्गावर एस टी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत जणांचा मृत्यू झाला आहे. तर 13 जण जखमी झाले आहेत. यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
जखमींवर सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसेच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांची अद्याप ओळख पटली नसल्याने या घटनेचा पोलिस पुढील तपास करत आहेत.
ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात असताना बुलढाणाच्या सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावाजवळ सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आणखी 5 प्रवाशांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
दरम्यान, पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाचाही परत येत असताना शेगाव शहरात काल अपघात झाला होता. सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराच्या पिलरला भाविकांची क्रुझर गाडी जोरदार धडकली होती. यात 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर 7 जण गंभीर जखमी झाले होते.