पुणे – G 20 परिषदेसाठी पुण्यात अनेक दिवसांपासून जय्यत तयारी सुरु आहे. रस्त्यांच्या रुंदीकरणापासून ते रस्तावरील लाइटिंगपर्यंतची सर्व व्यवस्था उत्तम करण्याची जबाबदारी महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिका देखील त्या अनुषंगाने प्रयत्न करत असल्याचे दिसून येते. सर्वकाही टापटीप दिसावे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये याचीही खबरदारी महानगर पालिकेकडून घेतली जात आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाई देखील केली जात आहे.
रस्त्यावर थुंकणाऱ्याकडूनच त्याचीही थुंकी साफ करून घेतली जात आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. महानगरपालिकेने आपल्या अधिकृत सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. सहा सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर स्वतः थुकलेली थुंकी साफ करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये त्याच्या बाजूला एक गाडी तर एक व्यक्ती देखील उभी असल्याचे पाहायला मिळते.
“जी 20 परिषद व स्वच्छ सर्वेक्षण 2023 निमित्त मुख्य रस्ते, फूटपाथ व दुभाजकांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत पुणे विद्यापीठ मार्गावर एका नगरिकावर कारवाई करून त्यांनी केलेली घाण त्यांच्याद्वारे स्वच्छ करण्यात आली” अशा आशयाखाली पीएमसी केअर या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
.@g20org परिषद व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ निमित्त मुख्य रस्ते, फूटपाथ व दुभाजकांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत पुणे विद्यापीठ मार्गावर एका नगरिकावर कारवाई करून त्यांनी केलेली घाण त्यांच्याद्वारे स्वच्छ करण्यात आली.#PMC #G20inPune #G20India pic.twitter.com/YkykpcTFYh
— PMC Care (@PMCPune) January 13, 2023
जी 20 परिषदेसाठी पुण्यात उत्तम प्रकारे व्यवस्था महानगर पालिकेकडून करण्यात येत आहे. त्यासाठी ठीक ठिकाणी रस्ता रुंदीकरण आणि सुशोभीकरण सुरु असल्याचे दिसून येते. तर अनेक ठिकाणच्या रस्त्यांवरील लाईटच्या खांबांना तिरंगा पद्धतीची आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.