नवी दिल्ली – श्रद्धा वालकर आणि आफताब पुनावाला प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. 26 वर्षीय श्रद्धाचा निर्घृण पद्धतीने हत्या करणाऱ्या आफताब विरोधात सर्वांकडूनच रोष व्यक्त केला जात आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला पुन्हा तुरुंगात नेण्यात आलं आहे. सध्या आफताबची दिल्ली पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
मात्र, या हत्याप्रकरणाच्या तपासात दररोज नवनवीन चक्रावून टाकणारी माहिती समोर येत असून, यामुळे सर्वांच्याच भुवया उंचगावल्या आहेत. पुन्हा एकदा या हत्याकांडाविषयी एक खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. मंगळवारी एम्समध्ये श्रद्धा वालकरच्या 23 हाडांचे पोस्टमार्टम (शवविच्छेदन) करण्यात आले. शवविच्छेदनाच्या विश्लेषणात श्रद्धाची हाडे धार-धार करवतीच्या साह्याने कापल्याचे स्पष्ट झाले. दिल्ली पोलीस जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात साकेत न्यायालयात याबद्दल आरोपपत्र दाखल करू शकतात.
याआधी 10 जानेवारी रोजी दिल्लीच्या साकेत कोर्टाने श्रद्धा वालकर हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या न्यायालयीन कोठडीत पुढील 14 दिवसांची वाढ केली होती. दुसरीकडे आफताब पूनावाला याने अभ्यासासाठी कायद्याच्या काही पुस्तकांची मागणी केली आहे. आफताबला उबदार कपडे देण्याचे निर्देशही न्यायालयाने अधिकाऱ्यांना दिले आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण…
श्रद्धा आणि आफताब हे दोघेही काही महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. एका डेटिंग अँपवरून दोघांची ओळख झाली होती. श्रद्धा घरच्यांच्या विरोधात जाऊन आफताबसोबत राहत होती. श्रद्धाने लग्नाचा आग्रह केल्याने आफताबने तिचे 35 तुकडे करून निघृण पद्धतीने हत्या केली. तब्बल सहा महिन्यानंतर हे प्रकरण उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.