India Alliance – कॉंग्रेसने उद्या बुधवारी दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक आयोजित केली आहे. तथापि या आघाडीतील काही नेते या बैठकीला त्यांच्या व्यक्तीगत कारणामुळे उपस्थित राहण्याची शक्यता नाही. त्यामुळे ही बैठक होणार की नाही या विषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे.
तथापि उद्या ६ डिसेंबर रोजी इंडिया आघाडीची बैठक ठरल्याप्रमाणे होईल आणि जे नेते उपस्थित नाहीत त्यांच्या समवेत पुन्हा डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात स्वतंत्र बैठक होईल अशी माहिती इंडिया आघाडीच्या सूत्रांनी दिली आहे.
टीएमसी सुप्रीमो ममता बॅनर्जी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह इंडिया आघाडीतील काही नेत्यांनी बुधवारी नियोजित बैठकीला उपस्थित राहता येणार नाही असे कळवले आहे.
त्या पाश्र्वभूमीवर ही भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. कॉंग्रेस कार्यकारीणीचे सदस्य आणि समन्वयक गुरदीप सप्पल, यांनी कळवले आहे की, इंडिया आघाडीच्या संसदीय पक्षाच्या नेत्यांची समन्वय बैठक 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होणार आहे.
त्यानंतर इंडिया आघाडीच्या पक्षाध्यक्ष/प्रमुखांची बैठक डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यात सर्वांना सोयीच्या तारखेला आयोजित केली जाईल. सूत्रांनी सांगितले की बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आजारी आहेत तर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन त्यांच्या राज्यात आलेल्या चक्रीवादळामुळे उपस्थित राहू शकत नाहीत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कौटुंबिक लग्नात व्यस्त आहेत. या तिन्ही नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षांना बैठक पुढे ढकलण्याची विनंती केली होती.दरम्यान जे नेते उद्याच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावतीने त्यांचे प्रतिनिधी मात्र या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.