पुणे- शिवसेनेचे पदाधिकारी दिपक विजय मारटकर यांच्या खूनातील मुख्य आरोपीस गुन्हेशाखा युनिट एकच्या पथकाने जेरबंद केले आहे. स्वप्निल उर्फ चॉकलेट सतीश मोडवे असे अटक आरोपीचे नाव आहे. मारटकर यांचा खून झाल्यापासून तो फरार होता. तो कुख्यात बापू नायर टोळीचा सदस्य असून सद्या नायरची टोळी तोच चालवत आहे.
मारटकर यांचा 2 ऑक्टोबर रोजी बुधवार पेठेतील गवळी अळीमध्ये धारदार शस्त्रांनी खून करण्यात आला होता. याप्रकरणी सनी कोलते व महेंद्र सराफ यांच्यामध्ये असलेल्या जुन्या राजकीय कारणावरुन हा खून करण्यात आला होता. याला बुधवार पेठेतील वर्चस्व वादाचीही किनार होती. महेंद्र सराफ व अश्विनी कांबळे यांच्या सांगण्यावरुन सनी कोलते, संदीप कोलते, रोहीत कांबळे, राहुल रागीर, अतुल भोसले, लखन ढावरे व इतर दोघांनी संगणमत करुन मारटकर यांच्या डोक्यावर, हातावर आणी तोंडावर धारदार शस्त्रांनी वार केले होते. याप्रकरणी फरारसखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दरम्यान गुन्हयातील मुख्य सूत्रधार चॉकलेट मोडवे हा तेव्हापासून फरार होता.
फरारसखाना पोलिसांबरोबरच गुन्हे शाखेची पथकेही त्याचा शोध घेत होती. गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाला तो इस्लामपुर, सांगली, कराड या परिसरात असल्याची खबर मिळाली होती. पोलीस कर्मचारी अजय पवार व अमोल पवार यांना मिळालेल्या खबरीनूसार पोलिसांचे एक पथक त्याचा शोध घेण्यासाठी तेथे गेले होते. दरम्यान त्यांना चॉकलेट हा कराड येथील पेठ नाका येथे असल्याची माहिती मिळाली. तो पांढऱ्या रंगाच्या क्रेटा गाडीने तेथे आला असता, त्याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्द अगोदर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत असे एकूण सहा गुन्हे दाखल आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक
सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल ताकवले, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत शिंदे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी अजय थोरात, अमोल पवार, इमरान शेख, योगेश जगताप, सुधीर माने, बाबा चव्हाण, अशोक माने, अजय जाधव, महेश बामगुडे, विजयसिंह वसावे, गजानन सोनुने, शशिकांत दरेकर यांच्या पथकाने केली.