1970 नंतर प्रथमच गेल्या वर्षी सर्वात कमी विवाह
बीजिंग – आता जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळख असलेल्या चीनमध्ये गेल्या काही वर्षामध्ये विवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहे. 2022 मध्ये ज्या लोकांनी लग्न केले ती आकडेवारी पाहता 1970 नंतर प्रथमच एवढ्या कमी प्रमाणात लग्न पार पाडली आहेत. 2022 मध्ये 68 लाख लोकांनी लग्न केले. सरासरी आकड्यापेक्षा हे प्रमाण निम्म्याने कमी आहे.
एकीकडे गेल्या साठ वर्षांच्या कालावधीत प्रथमच चीनची लोकसंख्या घटली असल्याने दुसरीकडे लग्न करणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी होत चालल्याने त्याचा थेट परिणाम जन्मदरावर होऊ लागला आहे. असेच चालू राहिले तर येत्या काही कालावधीमध्ये चीनची लोकसंख्या आणखीनच कमी होईल अशी भीती आता समाजशास्त्रज्ञांना वाटत आहे.
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने नुकतीच आकडेवारी जाहीर केली असून त्यामध्ये गेल्या चार वर्षांमध्ये झालेल्या विवाहांची माहिती देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2022 मध्ये लग्नानंतर नोंदणी केलेल्याची संख्या 68 लाख होती.
10 वर्षापूर्वी म्हणजे 2013 मधील आकडेवारी पाहिली असता त्यावर्षी तब्बल एक कोटी तीस लाख लोकांनी विवाहाची नोंदणी केली होती म्हणजेच हे प्रमाण निम्म्याने कमी आले आहे. चीनमधील युवकांची संख्या झपाट्याने कमी होत असल्यानेच विवाहाची संख्याही कमी झाली आहे. विवाह आणि जन्मदराचा थेट संबंध असल्याने लोकसंख्यासुद्धा घटू लागली आहे.