मिसिसिपीच्या खासदार सिंडी हाइड स्मिथ यांचे मत
मिसिसिपी – अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध केवळ मैत्रीचे नाहीत. या संबंधांना अनेक परिमाणे आहेत. संरक्षण क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारी आणि जागतिक व्यासपीठावर मोदींचे वाढत असलेले वलय, यामुळे हे उभय देशांमधील संबंध अधिक दृढ होतील, असे मत मिसिसिपीच्या खासदार सिंडी हाइड स्मिथ यांनी व्यक्त केले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बिडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या भेटीबद्दल अमेरिकेत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. पुढील आठवड्यात मोदी अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. त्यावेळी पंतप्रधान मोदींना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सिंडी हाइड स्मिथ यांनी दिली.
स्मिथ म्हणाल्या की, भारतीय पंतप्रधानांचा दौरा जगातील दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांमधील संबंधांचे महत्त्व दर्शवितो. विशेष म्हणजे, 22 जून रोजी वॉशिंग्टनमध्ये मोदींचे शासकीय पाहुणे म्हणून स्वागत करण्यात येणार आहे. त्याच दिवशी ते अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील.
अमेरिकेच्या सिनेटमध्ये स्मिथ यांनी सांगितले की, मी नरेंद्र मोदी यांचे हार्दिक स्वागत करण्यास खूपच उत्सुक आहे. पुढील आठवड्यात मोदी अमेरिका व भारत यांच्यातील संबंधांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी कॉंग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील. दोन्ही देशांमधील संबंध लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याच्या राज्याचा आदर करण्याच्या मजबूत पायावर बांधले गेले आहेत. भारत व अमेरिकेने शांतता, समृद्धी व जागतिक स्थैर्याला चालना देण्यासाठी सहकार्याची ताकद ओळखली आहे.