बिबट्याचे बछडे पुन्हा आईच्या कुशीत विसावले

ऊसतोडणी दरम्यान आढळलेल्या पिलांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी

जुन्नर (प्रतिनिधी) – ओतूर (ता.जुन्नर) हद्दीतील जाकमाथा शिवारात ऊसतोडणी सुरू असताना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. वनविभागाने कुशलतेने आई बछड्यांची भेट घडवून आणली. बछडे आईच्या कुशीत विसावल्याने ऊसतोडणीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, याच बछड्यांची आईच्या कुशीत विसावण्याची 20 दिवसांतील ही दुसरी घटना ठरली आहे.

जाकमाथा येथे शेतकरी वैभव तांबे यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले. शेतमालकांनी त्वरित वनविभागाशी संपर्क केल्यावर वनरक्षक सुदाम राठोड यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके व वनरक्षक अतुल वाघोले हेदेखील घटनास्थळी आले. दरम्यान, बछड्याच्या मायेपोटी आजूबाजूलाच वावर असणाऱ्या बिबट मादीचा उपस्थितांना संभाव्य धोका होता, त्यामुळे ऊसतोड थांबविण्यात आली होती. माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. निखील बनगर हेदेखील घटनास्थळी हजर झाले.

माणिकडोह रेस्क्‍यू टीमने बछडे ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करून शहानिशा केली. हे दोन्ही बछडे नर जातीचे असून ते यापूर्वी दि. 6 एप्रिलला त्याच परिसरात ऊसतोडणी दरम्यान आढळून आले होते. ते बछडे सुखरूप पुन्हा आईच्या कुशीत विसावल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे पुन्हा त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती होऊन सायंकाळी पुन्हा एकदा बिबट मादीच्या भेटीसाठी ठेवण्यात आले आणि काही वेळातच बछडे आणि आईची पुन्हा एकदा भेट झाल्यानंतर आई बछड्यासह निघून गेली. त्यानंतर ऊसतोडणी पुन्हा सुरू करण्यात आली.

बछड्यांच्या शरीरात मागील वेळी लावलेल्या मायक्रो चीपवरून त्यांची ओळख पटली. मागील 20 दिवसांत या बछड्यांच्या वाढीचा वेग कमालीचा दिसून येत असून ते अतिशय सुदृढ स्थितीत आहेत. दोन्ही ठिकाणांचा विचार करता मादीने बछडे 500 मीटर दूर नेले असावे, असा अंदाज आहे.
– योगेश घोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी, ओतूर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.