नवी दिल्ली – बुधवारी येथे चौदाव्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जची सनरायजर्स हैदराबादशी लढत होत असून गुणतालिकेत आघाडीवर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाकडे चाहते डोळे लावून बसले असतील.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसकेने सलामीचा सामना गमावल्यानंतर स्टाईलमध्ये पुन्हा बाजी मारली आहे. ते सलग चार विजयांसह भलतेच आघाडीवर आहेत आणि त्यांना आशा आहे की फिरोजशाह कोटला मैदान आणखी एका विजयाची संधी त्यांना देईल. तीन वेळच्या चॅम्पियन्सने 2020 चा हंगामातही आपला ठसा उमटवला होताच. शिवाय अनुभवी खेळाडूंनी भरलेल्या या संघाने आतापर्यंत आपली
सर्वोच्च कार्यक्षमता दाखविली आहे. अशातच आतापर्यंत सीएसकेच्या विजयात अष्टपैलू रवींद्र जडेजा हा एक प्रेरक शक्ती ठरला आहे.
रविवारी आरसीबीच्या शेवटच्या षटकात हर्षल पटेलवर जडेजाने केलेल्या हल्ल्यामुळे सामन्याचे संपूर्ण गणितच बदलून गेले होते. डावखुरा फिरकी गोलंदाज, आक्रमक फलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक असलेला जाडेजा संघाचा तारणहारच बनला आहे. तसेच फाफ डू प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड या दोन्ही सलामीवीरांना फॉर्म सापडला आहे तर सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांना जोरदार खेळी करता येईल, असा आत्मविश्वास आला आहे.
सीएसकेच्या फलंदाजांना रशिद खानच्या गोलंदाजीतील क्षमतेची जाणीव आहे पण सनरायजर्सच्या गोलंदाजांचा उर्वरित प्रतिहल्ला जास्त प्रभावी नाही. कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर जॉनी बेअरस्टो, “किवी’ केन विल्यमसन आणि रशिदची गोलंदाजी पाहता सनरायजर्स हैदराबाद त्यांच्या विदेशी खेळाडूंवरच जास्त अवलंबून आहे, असे दिसते. संघाचे सलामीवीर जर खेळू शकले नाहीत, तर मधली फळी वेगाने धावा करू शकत नाही, हे त्यांचे दुखणे आहे.
वॉर्नरला खराब कामगिरी विसरून बहरात येण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्याने सीएसकेचा वेगवान गोलंदाज दीपक चहरवर हल्ला चढवणे आवश्यक आहे. या संघात वॉर्नरकडेच चांगली कामगिरी करण्याची क्षमता आहे.
चहरव्यतिरिक्त स्पिन अष्टपैलू जडेजा आणि अनुभवी इम्रान ताहिरसह सॅम करन हे सीएसके गोलंदाजीचे मजबूत कॉम्बिनेशन आहेत. एसआरएचला वॉर्नर, बेअरस्टो आणि विल्यमसन यांच्यापैकी एकाची आवश्यकता भासेल. हैदराबादला गोलंदाजीत अनुभवी भुवनेश्वर कुमारला सातत्य नसले तरी दुखापतीमुळे यॉर्कर तज्ज्ञ टी नटराजनची अनुपस्थिती हा मोठा धक्का आहे.