दुर्गंधी आल्यावर नागरिकांनी केला पोलिसांना फोनल
महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी घेतली बाळाची काळजी
पिंपरी (प्रतिनिधी) – एरव्ही माणूस माणसाच्या मदतीला धावून जात असे. मात्र करोनाच्या काळात भीतीमुळे जिवंत माणसाला हात लावण्यास सध्या कोणी धजावत नाही. मृत झालेल्या आईच्या जवळ दीड वर्षांचे बाळ दोन दिवस उपाशीपोटी होते. घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. भुकेने व्याकुळ असलेल्या बाळास जेवण भरविण्यास शेजाऱ्यांनी नकार दिला. मात्र महिला पोलिसांनी भीतीची सर्व बंधने झुगारून त्या बाळाला मायेने जेऊ घातले. हा प्रकार फुगेवस्ती, भोसरी येथे सोमवारी (दि. 26) घडला.
सरस्वती राजेशकुमार (वय 29, रा. उत्तरप्रदेश) मृत महिलेचे नाव आहे. दिघी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सरस्वती या आपल्या पतीसह कामासाठी भोसरी येथे आल्या. मात्र गावाकडे निवडणुका असल्याने पती महिनाभरापूर्वी गावी गेला होता. तेव्हापासून सरस्वती आपल्या मुलाला घेऊन फुगेवस्ती येथे राहत होत्या. एका घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती दिघी पोलिसांना नागरिकांनी दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना घर आतून कडी लावून बंद असल्याचे दिसून आले. खिडकीमधून गजाच्या साहाय्याने दरवाजाची कडी काढली. त्यावेळी घरामध्ये सरस्वती या मृत अवस्थेत दिसून आल्या.
आईच्या मृतदेहाशेजारी अवघ्या दीड वर्षांचा मुलगा निपचित पडून होता. मुलगा अन्नपाण्यावाचून व्याकूळ होता. यामुळे शेजारील महिलेला सांभाळ करण्याची विनंती पोलिसांनी केली. मात्र करोनाच्या भितीमुळे कोणीही त्या बाळास घेण्यास तयार झाले नाही. अखेरी दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक बी.एस.शिखरे महिला पोलीस सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांना मुलाचा सांभाळ करण्यासाठी बोलावून घेतले. त्या दोघींनीही बाळाला दूध बिस्कीट खाऊ घातले. त्यानंतर त्या बाळाला थोडीशी तरतरी आली. पुढील उपचारासाठी बाळाला रूग्णालयात दाखल केले. बाळाची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यास दिघी येथील शिशुगृहात ठेवले.
व्हिसेरा राखून ठेवला
तर मयत सरस्वती राजेश कुमार यांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण न समजल्याने डॉक्टरांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. दरम्यान बाळाच्या वडिलांना पोलिसांनी माहिती दिली असून ते उत्तरप्रदेशमधून भोसरी येथे येण्यास निघाले असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन शिंदे यांनी सांगितले. महिला पोलीस कर्मचारी सुशिला गभाले आणि रेखा वाजे यांनी बाळाबद्दल दाखवलेल्या मायेचे कौतुक होत आहे.