मुंबई – पाकिस्तानी कलाकारांविरोधात राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायमच आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. नुकतंच मनसेच्या चित्रपट सेनेद्वारे ‘द लीजेंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी सिनेमाच्या प्रदर्शनाला विरोध करण्यात आला होता. मनसे नेते अमेय खोपकर यांनी याबाबत मनसे स्टाईलने इशारा देखील दिला होता. आजपासून हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता मात्र मनसेच्या इशाऱ्यानंतर या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आल्याचे समजते.
अभिनेता फवाद खान आणि माहिरा खान यांच्या महत्वाच्या भूमिका असलेला हा चित्रपट जगभरात हिट ठरत होता. मात्र मनसेने या चित्रपटाला विरोध दर्शवल्यानंतर याचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे. अमेय खोपकर यांनी ट्विट करत हे राज ठाकरे यांचे यश असल्याचे म्हंटले आहे. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात.”राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानी सिनेमाला दणका… मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचं प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही.”तसेच मनसेच्या या यशाबाबत खोपकर यांनी सर्व मनसे पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.
१)राजसाहेबांचा डंका, पाकिस्तानी सिनेमाला दणका
मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ या पाकिस्तानी चित्रपटाचं प्रदर्शन आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. केवळ राज्यातच नाही संपूर्ण देशभरात कुठेही हा चित्रपट आता प्रदर्शित होणार नाही.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) December 30, 2022
हा चित्रपट १३ ऑक्टोबरला पाकिस्तानसह जगभरात प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. २०० कोटींहून अधिक बिजनेस या चित्रपटाने केल्याने भारतातील प्रेक्षकांना देखील या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. परंतु मनसेच्या चित्रपट सेनेने थिएटर्सला देखील इशारा देत चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला होता.म्हणूनच आता या चित्रपटाचे प्रदर्शन रद्द करण्यात आले आहे.