सकाळी 9 ते सायंकाळी 5 सुरू राहणार
दररोज मालाच्या केवळ 100 वाहनांनाच प्रवेश : प्रशासक बी. जे. देशमुख यांची माहिती
पुणे – मार्केट यार्डातील गूळ-भुसार विभाग शुक्रवारपासून (दि.15) सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहणार आहे. या बाजारात दररोज शेतमाल आणि किराणा माल घेऊन येणाऱ्या 100 गाड्यांनाच प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली.
बाजार समितीत चेंबरचे पदाधिकारी आणि बाजार समितीचे प्रशासक, अधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. प्रशासक बी. जे. देशमुख, उपसचिव सतीश कोंडे, चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, उपाध्यक्ष अशोक लोढा, सचिव विजय मुथा, नगरसेवक आणि संचालक प्रवीण चोरबेले, राजेंद्र बाठिया, अजित बोरा, ईश्वर नहार, रायकुमार नहार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
लॉकडाऊन काळात व्यापाऱ्यांनी शहरात धान्य आणि किराणा माल कमी पडू दिला नाही. यापुढे अजून सुरळीत व्हावा आणि गर्दी कमी व्हावी याकरिता दुकाने उघडण्याची वेळ वाढवली आहे. त्यामुळे खरेदीदारांना वेळेच्या अंतराने येता येणार आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, बाजार समिती चेंबर