शिरूर – शिरूर शहरात महसूल विभागाच्या वतीने मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांमधील परप्रांतीय कामगारांना पाठवण्यासाठी एसटी बसची व्यवस्था केली आहे. परंतु याठिकाणी आता पुणे, पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे, चाकण, दौंड आदी शहर आणि तालुक्यातून परप्रांतीयांचे लोंढे शिरूरला दाखल होत आहेत. येणारे लोंढे संवेदनशील (हॉटस्पॉट) आहे. त्यामुळे शिरूरकांची चिंता वाढली आहे. महसूल प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे.
गुरूवार (दि.14) दुपारपर्यंत 164 एसटीमधून पावणेचार हजार नागरिकांना, रेल्वेने 1 हजार 93 परप्रांतीय, 700 वीटभट्टी कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले आहे. शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी जिल्ह्यात सर्वात जास्त एसटी व रेल्वेने परप्रांतीयांना पाठवण्याचे काम केले आहे. शिरूरला परप्रांतीय व अतिसंवेदनशील भागातील येणाऱ्या लोकांपासून करोनाची फैलाव होण्याची भीती निर्माण झाली आहे. चार भागांतील पोलीस व महसूल प्रशासन यांनी आपली जबाबदारी झटकू नये, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
रांजणगाव, कोरेगाव-भीमा, सणसवाडी, कोंढापुरी भागातील परप्रांतीय कामगारांना मध्यप्रदेश व उत्तराखंड, छत्तीसगड आदी राज्याच्या सीमेपर्यंत पाठवण्यासाठी शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख यांनी एसटी बसची व्यवस्था केली आहे. इतर तालुक्यातील प्रशासन हात झटकत असल्याचा संशय निर्माण होत आहे. शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख, शिरूर आगाराचे प्रमुख महेंद्र माघाडे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, महसूल मंडलाधिकारी निलेश घोडके, तलाठी विजय बेंडभर, पोलीस, आरोग्य कर्मचारी, एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांनी शिरूर शहरातून आत्तापर्यंत परप्रांतीयांना सीमेपर्यंत पाठविण्यासाठी 164 एसटीमधून पावणेचार हजार लोकांना पाठवले आहेत. परंतु शिरूरमध्ये वरील चार-पाच तालुका बाहेरील ठिकाणावरून येणाऱ्या परप्रांतीय नागरिकांच्या लोंढा थांबण्याचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असल्याने शिरूर महसूल प्रशासन चिंतेत पडले आहे.
तालुक्याबाहेरील मजुरही शिरूरमध्ये बससाठी येऊ लागले आहेत. इतर तालुक्यांनी बसची सोय करावी. पोलिसांनी चोख नाकाबंदी करून रेड झोनमधील नागरिकांना बाहेर पडू देऊ नये.
– लैला शेख, तहसीलदार.