मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण
गराडे – पुरंदर तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बोपगाव येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर रंगपंचमी आनंदोत्सव यात्रा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी झाली.
कानिफनाथ गडावर गुरुवार (दि. 21) मार्च ते शुक्रवार (दि. 29) पर्यंत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि. 30) पहाटे मंदिरात श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टच्या वतीने पूजा, अभिषेक करण्यात आली. तर श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्ट व समस्त ग्रामस्थाच्या वतीने दुपारी 12 वाजता नाथांची आरती झाली.
त्यानंतर 12.30 वा. पारंपरिक वाद्यांच्या गजरात प्रथम देवांच्या अंगावर रंग शिंपण्यात आला. त्यानंतर मंदिराच्या शिखरावरुन भाविकांच्या अंगावर रंगांची शिंपण करून रंगपंचमीने यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली.
दरम्यान, सकाळी 9 वाजता बोपगाव येथून पालखी-काठी वाजत गाजत व भाविकांच्या उपस्थितीत कानिफनाथ मंदिरावर गेली. त्यानंतर सासवड, भिवरी, गराडे, चांबळी, औताडवाडी, होळकरवाडी, वडकी, उरुळी देवाची येथील मानाच्या शिखर काठ्यांनी रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेत सहभाग घेतला.
रंगपंचमी आनंदोत्सव यात्रेचे आयोजन श्री नवनाथ देवस्थान पंच कमिटी ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानोबा फडतरे, उपाध्यक्ष दीपक फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, विश्वस्त शिवाजी जगदाळे, प्रकाश का. फडतरे, सुरेश फडतरे, प्रकाश का. फडतरे, महादेव फडतरे, नितीने फडतरे, रमेश फडतरे, मंगेश फडतरे, सोनबा फडतरे व आदीसह ग्रामपंचायतींचे पदाधिकारी व विविध पक्ष, संस्था, संघटना, मंडळे यांचे पदाधिकारी, बोपगावकर समस्थ ग्रामस्थ यांनी केले. तर सासवड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.