बारामती (प्रतिनिधी) : बारामती औद्योगिक क्षेत्रातील 175 कंपन्यांनी एमआयडीसी पोर्टलवरून कारखाने सुरू करण्याची परवानगी स्वतः (सेल्फ डिक्लेरेशन )घेतली आहे. तर 75 कंपन्यांनी 750 हून अधिक चारचाकी व दुचाकीचे परवाने घेतले आहेत. निम्म्याहून अधिक कारखाने सुरू झाल्याने बारामतीत औद्योगिक क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे .
सुरूवातीला राज्यातील काही औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरू करण्यासाठी सरकारने परवानगी दिली होती. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ, इंदापूर व जेजुरी एमआयडीसी समावेश होता. कोरोना बाधीत क्षेत्र असल्याने बारामती एमआयडीसीला मात्र सुरुवातीला परवानगी मिळाली नाही. एमआयडीसी पोर्टल वरून देखील बारामती एमाडिसी गायब होती. बारामती शहर कोरोना मुक्त झाल्यानंतर बारामती एमआयडीसी सुरू करण्याची मागणी उद्योजकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.
बारामती चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष प्रमोद काकडे , कार्याध्यक्ष दत्ता कुंभार तसेच किशोर भापकर , पांढरीनाथ कांबळे, स्वप्नील पाटील, महेश बल्लाळ, सदाशिव पाटील, चंद्रकांत काळे, अविनाश लगड, धनंजय जामदार, आधी उद्योजकांनी याबाबत पाठपुरावा केला.त्यानंतर सूत्रे फिरली.
नियम व अटींच्या शर्तीवर एमआयडीसी पोर्टलवर बारामती एमआयडीसी पुन्हा झळकली. परवानगी मिळाल्यानंतर दोन दिवसात जवळपास 175 कंपन्यांनी सेल्फ डिक्लेरेशन घेतले. त्यातील 75 कंपन्यांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचे 750 हून अधिक परवाने मिळविले. तालुक्यातील कटफळ येथे कोरोना संक्रमित रुग्ण आढळल्याने कटफळ गाव सील करण्यात आले आहे. कटफळ हद्दीत येणारा एमआयडीसीचा काही भाग कंटेनमेंट झोनमधून वगळण्यात आला आहे.
एमआयडीसीतील कारखाने सुरू करण्यासाठी घातलेली सेल्फ डिक्लेरेशनची अट जिल्हाधिकारी यांनी शिथिल केली होती. असे असले तरीदेखील बारामतीतील 175 उद्योजकांनी कारखाने सुरू करण्यासाठी एमआयडीसी पोर्टलवरून सेल्फ डिक्लेरेशन द्वारे परवानगी घेतली आहे. औद्योगिक क्षेत्रातील अजूनही काही उद्योजक कारखाने सुरू करण्याच्या तयारीत आहेत . त्यामुळे सेल्फ डिक्लेरेशन घेणाऱ्या उद्योजकांचा आकडा येत्या दोन दिवसात मोठ्या प्रमाणात वाढेल. 75 उद्योजकांनी चारचाकी व दुचाकीचे देखील परवाने मिळविले आहेत. उद्योजकांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले असून उद्योग सुरू झाल्याने बारामतीचा औद्योगिक क्षेत्राला पुन्हा एकदा गती येईल.”
– दत्ता कुंभार, कार्याध्यक्ष बारामती चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज