“शरःप्रभा’तर्फे कर्तृत्ववान महिलांचा गौरव
भोर – आजच्या समाजात महिलांचे अनेकाविध प्रश्न असुन महिलांना कार्यक्रमाला बोलवून त्यांचा प्रशस्तिपत्र देऊन सन्मान करणे म्हणजे पंढरपुरच्या वारीसमान असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणाकर यांनी केले.
भोर नगरपालिकेचे दिवंगत लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व. अमृतलाल रावळ यांच्या नवव्या स्मृतिदिन प्रसंगी श्रीमंत सौ. गं. पं. वाचनालयाचे सभागृहात शरःप्रभा प्रतिष्ठानतर्फे भोर शहरातील कर्तृत्ववान महिलांचे सन्मान आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख आतिथी म्हणून चाकणकर बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कैलासबेन रावळ होत्या, तर प्रमुख उपस्थितांमध्ये भोर नगरपालिकेच्या माजी नगरसेविका राजश्री रावळ, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, राजेंद्र ढवळे, सुरेश वाकणकर, अँड.संजय रोमण, ह.भ.प. किसन रोमण, उपस्थित होते. चाकणकर म्हणाल्या, ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे अनेकाविध प्रश्न आहेत. वंशाला वारसदार हवा ही मानसिकता बदलली गेली पाहिजे,
विधवा महिलांना हळदी-कुंकवाला बोलवून त्यांना सन्मानाची वागणूक आपल्या घरापासूनच द्यायला सुरुवात करा.
देवाच्या दर्शनाला त्यांना जाता यावे म्हणून आम्ही राज्य महिला आयोगातर्फे आरोग्यवारी सुरू केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी भोर शहरातील पहिल्या महिला एमबीबीएस डॉ. स्वाती जोशी, क्रीडा क्षेत्रातील शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या दीपाली कंक, रज्यातील पहिल्या श्वान प्रशिक्षक पोलीस नायक सुप्रिया किंद्रे (धुमाळ), वाहन विभागात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळवलेल्या महिला उद्योजिका मुक्ता शाह, स्नेहांकुर संस्थेच्या ऍड. वृषाली दातार, मैत्रीकुल विकास संस्था चिखालगावच्या ऍड. मंजिरी धुरी यांचा यावेळी गौरव करण्यात आला. प्रास्ताविक पार्थ रावळ यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे यांनी केले, तर विजय रावळ यांनी आभार मानले.