ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले तिसरे गोल रिंगण
पंढरपूर – ज्ञानोबा, माऊलीच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण सोमवारी (दि. 26) ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले. गोल रिंगणाचा नेत्रदीपक सोहळा झाल्यानंतर माऊली आणि संत सोपानकाका या दोन भावंडांची भेट पंढरपूर तालुक्यातील टप्पा येथे झाली.
संत ज्ञानेश्वर महराजांची पालखी सोमवारी सकाळी वेळापूरहून मार्गस्थ झाली. पुढे ठाकुरबुवा समाधी येथे माऊलींचे पालखी सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण पार पडले. येथे माऊलींची पालखी दाखल होताच सर्वत्र भगव्या पताका, टाळमृदंग आणि माऊली, माऊलीचा जयघोष सुरु होता. माऊलींच्या अश्वाने वायुवेगाने तीन फेऱ्या पूर्ण केल्या. यावेळी ज्ञानोबा माऊलींचा जयजयकार, टाळ मृदंगाचा जयघोष याने आसमंत दुमदुमून निघाला आणि याच वेळी साऱ्यांचे लक्ष अश्वांच्या धावेकडे लागले होते.अशा या उत्सहात रिंगण सोहळा संपल्यावर माऊलींच पालखी सोहळा टप्पा येथे पोहचला.
टप्पा येथे दोन भावंडाच्या भेटीचा भावपूर्ण सोहळा पार पडला. माऊलींची पालखी पाठोपाठ संत सोपानकाकांची पालखी देखील टप्पा येथे पोहचली. या वेळी दोन्ही पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांनी माऊली माऊलीचा जयजयकार, टाळांचा गजर, वारकऱ्यांचा ठेका अशा भावपूर्ण वातावरणात बंधू भेट झाली. याठिकाणी संत सोपानकाका आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्हीही पालख्यांचे रथ एकमेकांजवळ आले. याठिकाणीच दोन्हीही बंधू असणाऱ्या संतांची भेट झाली. पुढे दोन्ही संतांची पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी पोहचली.
दरम्यान, रिंगणाचे अंगणी, करीत टाळ-मृदंगाचा ध्वनी नाचले वैष्णव सारे , देहभान हरपूनी रिंगण सोहळ्यानंतर दिंड्या दिंड्यामध्ये विविध खेळ खेळले गेले . चोपदाराच्या निमंत्रणानंतर सर्व दिंड्या माऊलीला मध्यभागी घेवून गोलाकार बसल्या. टाळ-मृदंगाच्या निनादात माऊली माऊली नामाच्या जयघोषात विणेकऱ्यांनी माऊलीला प्रदक्षिणा घातली. देहभान हरपून वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या निनादात आसमंत व्यापून टाकला. जणू माऊलीसह वैष्णवांची ब्रह्मनंदी टाळी लागली.
उडीच्या कार्यक्रमानंतर माउलींची पालखी ठाकुरबुवा मंदिरात आणण्यात आली. ठाकुरबुवा हे माउलींच्या सोहळ्यातील दिंडीकरी. त्यांनी वारीच्या वाटेवर येथे देह ठेवला. त्यांच्या समाधीवर माऊलींच्या पादुका ठेवून पूजा करण्यात आली. त्यानंतर सोहळा तोंडले बोंडलेकडे मार्गस्थ झाला. सकाळी 11 वाजता सोहळा तोंडले बोंडले येथे पोहोचला. ग्रामस्थांनी तोफाची सलामी देत सोहळ्यावर गुलाबपाणी व फुष्पवृष्टी करीत स्वागत केले. सोहळा दुपारी नंदाच्या ओढ्यावर तोंडले येथे विसावला.
आज वाखरी मुक्कामी
माऊलींची पालखीचे मंगळवारी (दि. 27) बाजीराव विहीर येथे चौथे गोल तर दुसरे उभे रिंगण होणार आहे. त्या नंतर माऊलींची पालखी वाखरी येथे मुक्कामी असणार आहे.